कर्जासाठी बँकेत अर्ज केल्यानंतर बँक आपला क्रेडिट स्कोर तपासते. सर्व प्रकारच्या क्रेडिट इन्फॉरमेशन कंपन्या या क्रेडिट रिकॉर्डच्या आधारावर क्रेडिट स्कोर तयार करतात. म्हणजेच क्रेडिट स्कोर निश्चित करताना आपल्या लोन क्रेडिट संबंधीच्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा मांडला जातो. क्रेडिट स्कोर 300 ते 900 दरम्यान असतो. 750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोर हा चांगला मानला जातो. आपला क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर कर्ज मिळताना अडचणी येऊ शकतात. आपला क्रेडिट स्कोर हा एखाद्या कारणाने खराब असेल तर त्यात सुधारणा करण्यासाठी काही गोष्टीचे आकलन करावे लागेल.
क्रेडिट स्कोरमध्ये सुधारणा करण्यासाठी ,
१. कर्जाची वेळेत परतफेड न करणे हे क्रेडिट स्कोर खराब होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे. हप्त्याचा विचार केल्यास तो वेळेत कसा भरला जाईल, याची काळजी घेतली पाहिजे. हप्ता हा निश्चित केलेल्या तारखेलाच भरायला हवा.
२. अनिसिक्युर्ड लोन म्हणजे त्यात काहीच गहाण ठेवावे लागत नाही,असे कर्ज घेताना काळजी घेतली पाहिजे. उदा. वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज. कधीही दोन पेक्षा अधिक अनसिक्यूर्ड लोन घेऊ नये. यामुळे क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. याउलट ऑटो लोन, होम लोन यासारखे सुरक्षित कर्ज घेतल्यास आणि त्याचा हप्ता नियमित भरल्यास सिबिल स्कोर हा चांगला राहतो.
३. अनेकदा कोणत्याही कारणाविना क्रेडिट स्कोर हा खराब होतो. प्रत्यक्षात आपले लोन अकाऊंट किंवा क्रेडिट कार्डशी निगडीत माहिती बँकांकडून सिबीलला दिली जाते. या रिपोर्टिंगच्या प्रक्रियेत त्रुटी राहण्याची शक्यता असते. अशावेळी आपण नियमितपणे सिबील स्कोर तपासायला हवा. स्कोर अकारण खराब झाला असेल तर अर्ज देऊन त्यात दुरुस्ती करता येणे शक्य आहे.
४. एकाचवेळी अनेक कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका. अन्यथा क्रेडिट स्कोर खराब होण्याची शक्यता अधिक राहते. एकाचवेळी अनेक कर्ज घेतल्याने हप्ता अधिक राहतो आणि त्याची वेळेवर परतफेड करता येत नाही. अशावेळी क्रेडिट स्कोरमध्ये घसरण होते. म्हणून अनेक कर्ज घेण्याचे टाळावे.
५. एखाद्याचे संयुक्त खातेधारक किंवा गॅरेंटर होण्यापासून आपण दूर राहावे. कारण आपण ज्याची हमी दिली आहे, त्याने जर एखादी चूक केल्यास त्याचा फटका आपल्या सिबिल स्कोरला बसतो.
६. क्रेडिट कार्डचे बिल पेंडिंग ठेऊ नका. नियोजनाच्या आधारे शेवटच्या तारखेच्या आतच क्रेडिट कार्डची उर्वरित रक्कम भरावी आणि क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी योजना आखावी.
७. क्रेडिट स्कोर चांगला राहण्यासाठी दरमहा आपल्या क्रेडिट मर्यादेच्या केवळ तीस टक्केच खर्च करावा. यापेक्षा अधिक खर्च केला जात असेल तर आपण विचार न करता अनावश्यक पैसा खर्च करत असल्याचे दिसून येते. परिणामी सिबिल स्कोअर नकारात्मक होतो