Ganpati Decoration

Ganpati Decoration : बाप्पासाठी कायपण ! बंगळुरूमध्ये 2 कोटींच्या नोटा आणि 50 लाखांची नाणी वापरून केली गणपतीची सजावट

835 0

बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाच्या सजावटीत (Ganpati Decoration) सगळ्यात महत्वाचा असतो तो मखर. बाप्पाचा मखर अगदी क्रिएटिव्ह असावा असा प्रत्येकाचाच अट्टाहास असतो. मार्केटमध्ये तुम्हाला बरेच थर्माकॉलचे मखर दिसतील. मात्र कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील एका गणपती मंदिरात बाप्पाला चक्क नोटांच्या मखरामध्ये बसवण्यात आले आहे. या गणपती मंदिराला तब्बल 2 कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवण्यात आलं आहे.

बंगळुरूच्या पुत्तेनाहली येथील सत्य साई गणपती मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नोटांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सध्या या सजावटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. बाप्पाचं मखर सजवण्यासाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या आहेत.

या सगळ्यामुळे मंदिराला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एवढेच नाहीतर 22 सीसीटीव्ही कॅमेरेदेखील त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. सुमारे 150 स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही सजावट केली आहे. ही आगळीवेगळी सजावट पाहण्यासाठी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!