पुणे म्हटलं तरी लगेच विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी ही बिरूदं आपल्याला आठवतात. मात्र खरंच पुणे हे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी राहिलंय का ? कारण याच विद्येच्या माहेर घरात विद्यार्थिनींवर कधी शिक्षकांकडून कधी विद्यार्थ्यांकडून तर कधी स्कूल व्हॅन चालकाकडून अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दर्शना पवार हत्याकांड, एकतर्फी प्रेमातून झालेला कोयता हल्ला, शाळेतील पीटीच्या शिक्षकाने केलेले अत्याचार अशा अनेक घटनांनी पुणे शहर हादरून गेलंय. अशीच आणखी एक घटना घडली असून एका अल्पवयीन मुलीवर महाविद्यालयाच्या परिसरातच लैंगिक अत्याचार केले आणि ही घटना महाविद्यालयाकडूनच दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हे प्रकरण आता समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यातील संगमवाडी परिसरात असलेल्या नामांकित महाविद्यालयात शिकणारी ही 16 वर्षांची मुलगी… या मुलीचे इंस्टाग्राम च्या माध्यमातून काही मुलांशी ओळख झाली. याच ओळखीतून एका मुलाने थेट महाविद्यालयाच्या आवारात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तर दुसऱ्याने तिच्या घरी जाऊन अत्याचार केले. इतर दोन मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हा सगळा प्रकार या मुलीच्या मैत्रिणीने महाविद्यालयात गुड टच बॅड टच उपक्रम सुरू असताना काउन्सिलरला सांगितला. त्यातून हा प्रकार आधी महाविद्यालयापर्यंत आणि नंतर पोलिसांपर्यंत पोहोचला. अत्याचाराच्या या गुन्ह्यात आता चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. मात्र महाविद्यालयाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता सर्वसामान्य पुणेकरांसह महाविकास आघाडी सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज देखील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविद्यालयातील लोकांवरही कारवाई करण्याची मागणी केली.
पुणेकरांचा सरकारवर रोष
दररोज लैंगिक अत्याचारांच्या घटना समोर येत असल्याने पुणेकर आता व्यथित आणि भयभीत झाले आहेत. बहुतांश पुणेकरांचा रोष सरकारवर जास्त दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांबरोबरच राज्य सरकारने सुद्धा लक्ष घालून महिला अत्याचारांचं प्रमाण कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे.