पुणे: ग्रामीण भाग हा देशाचा आणि राज्याचा आधार असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.
अल्पबचत भवन येथे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, शरद आदर्श कृषीग्राम, कृषीनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक, उत्कृष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी व शिक्षण विभागातील विजेते स्पर्धक यांना देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक शालिनी कडू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, निर्मला पानसरे, कृषि व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती बाबुराव वायकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम विधाते आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आपली संस्कृती म्हणजेच जीवन व्यवहार गावामध्ये पहावयास मिळतो. गावांच्या उन्नतीसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. मात्र त्यासोबतच गावातील शेती, जोडधंदे वाढले पाहिजेत. महिला व मुलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात.
जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यात १५० कोटींची वाढ करण्यात आली असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या एप्रिल पासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तेथील अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्यासमवेत विकासकामांबाबत आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनातर्फे समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. पुणे जिल्हा परिषद अशा योजना आणि उपक्रमांबाबत राज्यात आघाडीवर आहे. पीकविमा योजना, महिलांना एसटी बसच्या तिकिटात सवलत आदी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, असेही श्री.पाटील म्हणाले.
प्रस्ताविकात आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदेच्या चार विभागातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शेती उत्पादन वाढले, भूजल पातळीतही वाढ झाली, कुपोषित मुलांची संख्या कमी झाली आहे. निपुण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली आहे. लंपी रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने फिरते दवाखाने चालवून चांगले कार्य केले आहे. १ हजार २०० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. आदर्श अंगणवाड्यांमधील सुविधांसाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सन २०२० -२१, २०२१-२२ चे कृषिभूषण स्व. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृषिनिष्ठ व शरद आदर्श कृषिग्राम पुरस्कार, सन २०२१-२२ चे आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका, मदतनीस पुरस्कार, सन २०२२-२३ चे जिल्हास्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पुरस्कार, सन २०२१-२२ चे आदर्श गोपालक पुरस्कार, उत्कृष्ट पशुवैद्यकीय पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्रदान करण्यात आले.