पुणे- मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आज स्पष्ट झालं आहे. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली. बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याचं त्यांनी सांगितले.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक ठरलं आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार असून 12 वीची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या काळात ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. कोविड असल्याने यावर्षी शाळा तिथं परीक्षा केंद्र असेल. थोडक्यात आपल्याच शाळेत मुलांना परीक्षा देता येईल. 15 पेक्षा अधिक परीक्षार्थी असलेल्या शाळांना उपकेंद्र मिळेल तर 15 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना जवळचे परीक्षा केंद्र मिळेल अशी माहितीही शिक्षण मंडळाने दिली आहे.
परीक्षेसाठी एका वर्गात जास्तीत जास्त 25 विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था असेल. तसेच सोशल डिस्टन्सिंगसाठी झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांना बसवले जाईल. असेही शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे. यंदा बहिस्थ शिक्षक परीक्षक म्हणून न नेमता शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहतील. बोर्डाच्या परीक्षेसाठी लस घेणे बंधनकारक असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची लेखनाची सवय सुटलेली असल्यामुळे यंदा 70 ते 80 गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून 50 ते 60 गुणांच्या पेपरला 15 मिनिटं अधिक वेळ दिला जाईल.