पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे अधिकाधिक विस्तारत चालले आहे. अनेक ठिकाणचे रूट सुरू आहेत. तर काही ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुलभ आणि जलद गतीने प्रवास करता यावा यासाठी पुणे मेट्रो कडून प्रजासत्ताक दिनानिमित्त एक खास सवलत देण्यात आली आहे.
पुणे मेट्रोचे ‘एक पुणे ट्रांझिट कार्ड’ 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी सवलतीमध्ये उपलब्ध असणार आहे. यात पहिल्या 5000 प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असतील. नेहमी 118 रुपये शुल्क असणारे हे कार्ड 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी केवळ वीस रुपयात उपलब्ध असणार आहे. हे कार्ड खरेदी करण्यासाठी कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नसेल. आपल्या जवळच्या मेट्रो स्थानकाला पुणेकरांनी भेट देऊन हे कार्ड मिळवावे असे आवाहन पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार दहा टक्के सवलत आणि शनिवार-रविवारी 30 टक्के सवलत मिळणार आहे.