उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे. तसंच मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर,चंदन साळुंके,सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काय घडलं नेमकं? शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत हे पुण्याच्या दौऱ्यावर होते.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी उदय सामंत यांच्या वाहनावर कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या वहानाची मागची काच फुटली. विशेष म्हणजे मंगळवारी शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील कात्रजमध्ये सभा होती. या सभेला शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.