पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे टेन्शन वाढले आहे. नुकतंच पुण्यातील आणखी तीन गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील रुग्णांची संख्या नऊ वर पोहोचली आहे.
पुण्यात याआधी झिका विषाणू चा संसर्ग झालेले सहा रुग्ण होते मात्र आता पाषाण, आंबेगाव आणि मुंडवा भागातील तीन गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे. या आजाराचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांनाच असतो. त्यामुळे पुण्यातही गर्भवती रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्व गर्भवती महिलांनी काळजी घ्यायला हवी. वेळोवेळी सर्व तपासण्या आणि सोनोग्राफी करायला हवी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्याचबरोबर झिकाच्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेतर्फे औषध फवारणी आणि सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
झिका टाळण्यासाठी काय करावे?
झिकाचे विषाणू हे डासांमधून पसरतात. त्यातही हे डास घाणीवर तयार न होता चक्क शुद्ध पाण्याच्या साठ्यामध्ये तयार होतात. त्यामुळे या डासांची उत्पत्ती घरांमध्ये जास्त होत आहे. त्यामुळेच दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस शुद्ध पाण्याचे साठे करू नयेत. पाण्याच्या टाक्या, साठवणीची भांडी दर दोन दिवसांनी स्वच्छ करावीत. डास मारण्यासाठी विविध उपाय करावेत. तसेच डासांपासून रक्षण करणारे क्रीम शरीराला लावावेत.