पुणे जिल्हा आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पुण्यातील प्रमुख चारही धरणातल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत पुण्यातील खडकवासला धरणात 70 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर पानशेत धरण देखील 50 टक्के भरले असून या धरणात आता 5.32 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जून महिन्यात काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र जून महिन्या अखेरपासून संपूर्ण जुलै महिन्यात आतापर्यंत चांगला पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे. त्यामुळे इथून पासून 19 जुलै पर्यंत टेमघर धरणात तब्बल 1278 मिमी इतका पाऊस झाला असून खडकवासला धरणात 281 मिमी, वरसगावमध्ये 761 मिमी तर पानशेतमध्ये 758 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली असून पुणेकरांचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. मात्र खडकवासला धरणातील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे उद्या म्हणजेच दिनांक 21 जुलै रोजी खडकवासला धरणातून मुठा नदीवरील उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. ज्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या परिसरात, पाण्याच्या प्रवाहात आणि कालव्यात नागरिकांनी जाऊ नये, जीविताची खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कऱ्हाडे यांनी केले आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
सध्या पानशेत धरणात सर्वाधिक टीएमसी म्हणजेच 5.32 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तर पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणात 4.68 टीएमसी, खडकवासला धरणात 1.37 टीएमसी आणि टेमघर मध्ये 1.17 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.