Pune News

Pune News : उतारावर PMP बसचा अचानक ब्रेक फेल झाला आणि मग…

1201 0

पुणे : काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण आपण सगळ्यांनी ऐकलीच असेल. याच म्हणीचा प्रत्यय शुक्रवारी पुण्यातील (Pune News) कर्वेनगरवासियांना आला. प्रवासी घेऊन जात असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाले आणि उतारावर ही बस भरधाव वेगात खाली येत असतानाच बस चालकाने प्रसंगावधान राखत ही बस एका इमारतीच्या भिंतीला धडकवत थांबविली.त्यामुळे रस्त्यावरील नागरिक आणि प्रवासी यांचा जीव वाचला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
साधारणपणे 25-30 प्रवासी घेऊन पीएमपीएमएल बस एनडीएकडून महापालिकेकडे चालली होती. दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास ही बस कर्वेनगर जवळ आली. वनदेवी मंदिरापासून ही बस गांधीभवनकडे उतारावर जात होती. त्यावेळी बसमधून जोरजोरात हवा गेल्यासारखा आवाज येऊ लागला. या बसचे चालक हनुमंत मधुकर आढाळे (वय 50) यांना बसचे चाक पंक्चर झाल्यासारखे वाटले. त्यांनी ब्रेक मारून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही बस थांबत नव्हती. ब्रेक फेल झाल्याचा अंदाज आल्याने चालक आढाळे यांच्या काळजाचा ठोका चुकला. बँक ऑफ महाराष्ट्रपासून गांधी भवनपर्यंत तीव्र उतार आहे. उत्सवाचे दिवस असल्याने रस्त्यावर नागरिक मोठ्या प्रमाणावर होते. बस थांबली नाही तर अनेक वाहनांना धडक बसण्याची आणि मोठा अपघात घडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे ही बस काहीही करून थांबविणे गरजेचे होते.

यानंतर चालक हनुमंत आढाळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संयम बाळगत तसेच प्रसंगावधान राखत उताराजवळ असलेल्या योगदा अपार्टमेंटजवळील रुपी बँकेची शाखा असलेल्या इमारतीवर ही बस चढवली. कठड्याला धडकून मोठा झटका खात ही बस जागेवर थांबली. प्रवाशांना नेमके काय घडले याची माहिती समजताच त्यांनी बसचालक हनुमंत आढाळे यांना धन्यवाद दिले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!