पुणे : पुणे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या एक, एक सुविधा मिळत आहे. 1 ऑगस्टपासून पुणे शहरातील मेट्रोचे (Pune Metro) दोन आणखी मार्ग सुरु झाले. यामुळे मेट्रो (Pune Metro) प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर पहिल्याच आठवड्यात 3 लाख 2 हजार 904 प्रवाश्यांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. या दरम्यान मेट्रो प्रवाससंदर्भातील काही समस्या पुढे आल्या. त्या समस्या त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडल्या आणि विशेष म्हणजे त्या समस्या सुटल्यादेखील आहेत.
लोकांनी काय समस्या मांडल्या ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी चांदणी चौकातील पुलाच्या उद्गाटन कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोमधील प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते वनाज मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करताना अजित पवार यांनी अनेक लोकांशी चर्चा केली. यावेळी मेट्रोपर्यंत येण्यासाठी बसेसची सुविधा नाही, स्वत:च्या वाहनांने आल्यास वाहनतळ नाही, मेट्रो सकाळी सात वाजता सुरु होते, त्यामुळे महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होते. अशा विविध समस्या त्यांनी मांडल्या.
‘हा’ करण्यात आला बदल
मेट्रो सकाळी सात ऐवजी आता सहा वाजता सुरु होणार आहे. तसेच रात्री 10 ऐवजी रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे पुणेकर शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच सिंहगड एक्स्प्रेसने जाणाऱ्या लोकांची सुविधा होणार आहे. प्रगती एक्स्प्रेस आणि डेक्कन क्विन या गाड्या यामुळे मेट्रो लवकर सुरु होणार असल्यामुळे पकडता येणार आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अजित पवार यांनी केल्या सूचना
मेट्रो (Pune Metro) लवकर सुरु करण्याची मागणी पुणेकरांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मेट्रोच्या वेळेमध्ये बदल करण्याचे आदेश दिले.