Pune News

Pune News : धरणाच्या पाण्याचा अंदाज चुकला अन्; पुण्यातील बापलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

33804 0

पुणे : पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यातील जयतपाड या ठिकाणी असणाऱ्या भाटघर धरणाच्या (Pune News) बॅकवॉटरमध्ये बुडून बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 15 ऑगस्टनिमित्त पर्यटनासाठी आलेले वडील-मुलगी भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दोघांचे मृतदेह मृतदेह मिळाले आहेत. मुलीचा मृतदेह रात्री सापडला तर वडिलांचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळून आला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय 45) आणि ऐश्वर्या मनोहर धर्माधिकारी (वय 13) असे मृत पावलेल्या बापलेकींची नावे आहेत.

काय घडले नेमके?
धर्माधिकारी कुटुंब हे मित्र परिवारासह 15 ऑगस्टच्या निमित्ताने फिरण्यासाठी भोर तालुक्यातील जयतपाड या ठिकाणी गेले होते. हे सर्वजण दुपारी 4वाजताच्या सुमारास सिमा फार्म पाठीमागे भाटघर धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी गेले होते. यावेळी शिरीष हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. ते खोल पाण्यात उतरले, त्यानंतर त्यांची मुलगी ऐश्वर्या हिला देखील त्यांनी तिथे बोलावून घेतले. दोघेही पाच ते सहा मिनिटं खोल पाण्यात पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या दोघांना वाचविण्याचे प्रयत्न केले.

यावेळी नागरिकांनी ऐश्वर्याला बाहेर काढले. त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तातडीने भोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आज सकाळी शिरीष धर्माधिकारी यांचाही मृतदेह मिळाला असून शवविच्छेदनासाठी तो पाठवण्यात आला आहे. भोर पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धर्माधिकारी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide