पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Accident) अंबेगाव तालुक्यातून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बेल्हे-जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगावामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक तरुण जागीचा ठार झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कसा झाला अपघात?
आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे हा भीषण अपघात घडला आहे. बेल्हे-जेजुरी महामार्गावर कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. रसिक दौंड असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे रसिक दौंड हा एकुलता एक होता. यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
बेल्हे जेजुरी महामार्गावरून घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव अल्टो कारने रसिकच्या बाईकला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातानंतर अल्टो कार देखील महामार्गावर उलटल्यानं कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा बेल्हे – जेजुरी महामार्गावरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.