पुण्यात लोकप्रतिनिधींची दादागिरी ! मारहाणीच्या आरोपाखाली राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

1892 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केली. बाबुराव चांदेरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. या अगोदरही बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, या घटनेनंतर अजित पवारांच्या पक्षासह बाबुराव चांदेरे यांच्यावर टीका केली जात आहे. या घटनेवर अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे. की, जो प्रकार झाला आहे, ते मला आवडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुराव चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण केली. व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी करण्यात आली. त्यानंतर मारहाण करत फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विजय रौंदळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली. कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारासमोर हा प्रकार घडला. यानंतर आता बाबुराव चांदेरे यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याबाबत आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.

Share This News
error: Content is protected !!