दरवर्षी महाराष्ट्राचे चित्ररथ लक्ष वेधून घेणारे असतात. अनेकदा महाराष्ट्राच्या चित्ररथांनी पुरस्कारही मिळवला आहे. दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी अनेकदा महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित चित्ररथ तयार करुन राज्याला बक्षिस मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. महाराष्ट्राने १९७१ ते २०२३ या वर्षांमध्ये तब्बल १४ वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळवला आहे. विशेष म्हणजे या १४ पैकी ३ पुरस्कार सलग तीन वर्ष मिळाले आहेत. यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ पाहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालचा चित्ररथ वगळण्यात आला होता. त्यावेळीही आरोप प्रत्यारोप झाले होते. यावर्षी मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर दिसला नाही. यामागचं कारण समोर आलं आहे.
दरवर्षी चित्ररथांवरुन वाद होतात. त्यामुळेच या चित्ररथांचं नियोजन करण्याची जबाबदारी असलेल्या संरक्षण मंत्रालयाने तीन वर्षातून एकदा तरी प्रत्येक राज्याला चित्ररथ सादर करण्याचा नियम केला होता. केंद्र सरकारच्यावतीने संरक्षण मंत्रालयाकडूनच कोणकोणत्या राज्यांचे चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनामध्ये सहभागी होणार हे निश्चित केलं जातं. २६ जानेवारीला सामान्यपणे २६ चित्ररथ पथसंचलनात सहभागी होतात. यामध्ये १० रथ हे मंत्रालय आणि १६ रथ हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतात. वेगवेगळी मंत्रालये, संरक्षण दलांनाही राखीव १० रथांबरोबरच कधीतरी अधिकच्या पाच जागा दिल्या जातात. यंदा ज्या १६ राज्यांचे चित्ररथ कर्तव्यपथावर दिसले त्यामध्ये महाराष्ट्राचं नाव नव्हतं. एका वर्षा आड दरवर्षी काही राज्य वगळली जातात आणि इतर काही राज्यांना प्राधान्य दिलं जातं. यामुळे सर्वांना समान प्रतिनिधित्व मिळतं. त्यामुळेच या वर्षी महाराष्ट्राचं नाव वगळण्यात आलेल्या राज्यांमध्ये असल्यानेच महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी कर्तव्यपथावर दिसला नाही.