पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीचा खून; मारेकऱ्यांच्या हल्ल्यात पत्नीही जखमी

240 0

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीची कारवार तालुक्यातील हाणकोण येथे रविवारी (ता. २२) पहाटे निर्घृण हत्या करण्यात आली. विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) असे त्यांचे नाव असून, ते मूळ हाणकोण येथील रहिवासी होते. तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा पुण्यात मोठा व्यवसाय आहे. नाईक यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या पत्नी देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक नाईक हे पुण्यातील उद्योगपती असून, त्यांचा इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचा व्यवसाय आहे. ते मूळचे हाणकोण येथील रहिवासी होते. हाणकोण मधील देवीच्या उत्सवानिमित्त ते गावी गेले होते. उत्सव संपल्यानंतर त्यांच्या आईचं श्राद्ध असल्याने ते आणखी काही दिवस तिथेच राहिले.

रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबरला सकाळी ते पुण्याला परतण्याच्या तयारीत होते. मात्र त्याचवेळी सकाळी साडेपाचच्या दरम्यान चार ते पाच अज्ञात इसमांनी मोटारीतून येऊन त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला केला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी वृषाली देखील होत्या. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. मात्र नाईक यांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला.‌

पोलिस अधीक्षक के. नारायण यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला. तर याप्रकरणी सदाशिवगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला याचा तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!