पुण्यातील एका कुख्यात टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
एन. के. गँगचा म्होरक्या निखिल उर्फ निक्या मधुकर कांबळे (वय २१), अतिब उर्फ बांडा अकील सय्यद (वय १९, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा), रुपेश गायकवाड (वय २२, रा. नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेजवळ, येरवडा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावं आहेत.
या सर्व गुंडांवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे येरवडा, विमान नगर, विश्रांतवाडी आणि कोरेगाव पार्क या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. या गुंडांनी एका तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याच्याकडे अंगठी, सोनसाखळी आणि रोख रक्कम लुटली होती. त्याचबरोबर वाहनांची तोडफोड करून परिसरामध्ये दहशत वाचवण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळेच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर टोळीचा मोरक्या कांबळे याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्वात ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) मान्यता देऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.