पुणे : पुण्यामध्ये (Pune) एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. यामध्ये पत्नीने जेवणाचा डबा बनवून न दिल्यामुळे आरोपी पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करून त्याला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शीतल सोमनाथ पांडागळे (वय 27, रा. उंड्री) (Sheetal Somnath Pandagale) असे मृत पत्नीचे तर सोमनाथ महादेव पांडागळे (वय 30) (Somnath Mahadev Pandagale) असे आरोपी पतीचे नाव आहे. सोमनाथ बिगारी काम करतो. शीतल ही फिरस्ती होती. त्यातून त्यांची ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर होऊन त्यांनी एका मंदिरात जाऊन विवाह केला होता. यानंतर ते पुण्यात भाड्याने घर घेऊन राहत होते.
घटनेच्या दिवशी कामावर जाताना जेवणाचा डबा न दिल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर आरोपी पतीने बांबूच्या सहाय्याने शीतलला मारहाण केली. मारहाणीनंतर काही वेळात तिला फिट आली आणि ती बेशुद्ध पडली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आले. यावेळी डॉक्टरांना तिच्या अंगावर मारहाणीचे निशाण दिसून आले. यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.