‘मी कोणाला घाबरत नाही..’ म्हणत पूजा खेडकरच्या आईची पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकी
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. काल त्यांच्या आईने माध्यमांच्या प्रतिनिधींशी आरेरावे केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पूजा यांची आई हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचे दिसून येत आहे.
हा व्हिडिओ मुळशी मधील असल्याची माहिती मिळाली असून खेडकर कुटुंबाने या ठिकाणी 25 एकर जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी केल्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याने त्यांना रोखल्यानंतरही शेतकऱ्याचे काहीच ऐकून घेतले नाही. पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर या थेट बाउन्सर घेऊन या ठिकाणी पोहोचल्या. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी चक्क पिस्तूल दाखवत या सर्व शेतकऱ्यांना धमकावले. त्याचबरोबर ‘हे करू नका असं मला कुठलाही कायदा सांगत नाही’, मी कुणालाही घाबरत नाही’, अशा शब्दात व्हिडिओ काढत असलेल्या लोकांनाही धमकावल्याचे दिसून येत आहे. तर याहून गंभीर गोष्ट म्हणजे संदर्भात संबंधित शेतकरी हे पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची तक्रार देखील नोंदवून घेतली नाही. त्यामुळे हे खेडकर कुटुंबीय कोणाच्या हिंमतीवर हे सगळं करत होते ? त्यांच्यावर नेमका कोणाचा वरदहस्त आहे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.