Beed:

कल्याणीनगर मध्ये पुन्हा हिट अँड रन; कारचा धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू 

459 0

पोर्शे कार अपघातानंतर हादरून गेलेले कल्याणी नगर पुन्हा एकदा हिट अँड रन अपघातामुळे चर्चेत आले आहे. कल्याणी नगर मध्ये काल पुन्हा हिट अँड रन ची घटना घडली.‌ एका भरधाव वेगात आलेल्या कारने पंधरा वर्षीय शाळकरी मुलाला जोरात धडक दिली, ज्यात या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शाश्वत राम बोगाडे (वय 15, रा. कुमार कृती सोसायटी, कल्याण नगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कल्याणी नगर परिसरातील सोसायटी समोरून शाश्वत हा सायकल वरून शाळेत जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी मागून आलेल्या कारने त्याच्या सायकल ला जोरात धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी मयत मुलाच्या वडिलांनी तक्रार नोंद केली आहे. त्या आधारे कार चालक रविकांत रामदिन गौर (वय -37 रा. रोहन निगम अपार्टमेंट, विमाननगर) याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अपघातावेळी आरोपीने मद्य प्राशन केले होते का ? हे वैद्यकीय चाचणीच्या अहवालातून स्पष्ट होईल. त्याचबरोबर अपघात स्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम देखील सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तपास करून आरोपीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!