दोन दिवसांपासून पुणे शहरात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती (helmet) केली जाणार असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई (Pune Traffic rule) करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भातल्या काही बातम्या देखील प्रसिद्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. याविषयीची माहिती कसब्याचे आमदार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी दिली आहे.
हेल्मेट सक्तीचा हा नियम केवळ महामार्गांसाठी असून शहरातील मध्यवर्ती भागात हा नियम लागू असणार नाही. हेल्मेट सक्ती संदर्भातील नियम हे शहरातील दुचाकी चालकांसाठी नसल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली असल्याचं आ. रासने यांनी सांगितलं आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. यात सर्वाधिक बळी हे दुचाकीस्वारांचे जातात त्यामुळेच आता दुचाकी चालकासह सहप्रवाशांना देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याविषयीची माहिती हेमंत रासने यांनी दिली आहे. रासने म्हणाले, ‘पुण्यात हेल्मेटसक्तीची कारवाई कडक करण्यात येणार असून सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. हेल्मेट नसल्यास दोघांवरही कारवाई करण्यात येईल, वृत्त प्रसिद्ध होत आहे. यामुळे मध्यवर्ती शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून अनेकांनी मला संपर्क साधून विचारणा केल्यामुळे मी पोलीस आयुक्तांची संपर्क साधला. त्यावेळी हे आदेश महामार्गांसाठी असून मध्यवस्तीतील नागरिकांवर याचा परिणाम होणार नसल्याचं, आयुक्तांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठी असतात त्यामुळे महामार्गांवर गाडी चालवताना सर्वांनी त्याचे पालन करावे. अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे.