कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पुणे-मुंबई रेल्वे मासिक पासची सेवा बंद आहे. मात्र सद्यस्थितीला कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे.
दुसरीकडे , बाधित रुग्णांची संख्याही शून्यावर आली आहे. त्यामुळे येत्या 22 मार्चपासून रेल्वे मासिक पास व जनरल तिकिटाची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रेल्वेने पुणे – मुंबई असा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मासिक पासची सुविधा पूर्ववत व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघटनेतर्फे वारंवार पाठपुरावा केला होता.
नोकरी , व्यवसायाच्या निमित्तानं नियमितपणे पुणे- मुंबई असा प्रवास करणारे अनेक प्रवाशी आहेत. मधल्या काळात कोरोनाच्या महामारीमुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे सेवा सुरु करण्यात आली, पण पुणे-मुंबई रेल्वे प्रवास करण्यासाठी मासिक पास आणि जनरल तिकिटाची सुविधा अद्याप सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे प्रवासी संघटनेकडून ही सेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती. पुणे-मुंबई रेल्वे मासिक पासची आणि जनरल तिकिटाची सेवा 22 मार्चपासून पूर्ववत होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांनी स्वतःहून करोना नियमांचे पालन करावे. जेणेकरून कमी झालेला करोना पुन्हा वाढू नये, यासाठी खबरदारी घ्यावी , असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी केलं आहे.