पुण्यात जीबीएस अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या पुण्यातील या रुग्णांची संख्या ७४ वर जाऊन पोहोचली आहे. यातील १४ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर पाच रुग्णांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी ५० बेड तर १५ आय सी यू बेड हे आरक्षित करण्यात आले आहेत.ज्या खाजगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासोबतच नवले हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी खाजगी दवाखाने रुग्णांची बिलं किती घेतात, यावर ही अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडसिटी, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे.
वाढते रुग्ण पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या आजारावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, आयुक्तांनी कमला नेहरू हॉस्पिटलला रुग्णांची व्यवस्था केलेली आहे. पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आपण वायसीएमला ही सगळी व्यवस्था केलेली आहे. जसा करोनाच्या काळामधील संकट आपण वेळीच ओळखून उपाययोजना केलेल्या होत्या, तसं हेही एक आजाराचं संकट आपल्यावर आल आहे. रुग्णांची वाढ होत आहे. पण घाबरून जाऊ नका त्या संदर्भामध्ये संपूर्णपणे माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सर्व गोष्टींवर आरोग्यमंत्र्यांइतकेच बारकाईने लक्ष आहे. अधिकाऱ्यांना तसेच डॉक्टरांना पण योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. या आजाराचे मोठे बिल होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलला देखील मोफत उपचार देणार आहोत. काही ठिकाणी औषध महाग देत आहेत, नागरिकांचा आरोग्य चांगलं ठेवणं ही राज्य सरकारची देखील जबाबदारी आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटसाठी ससूनमध्ये देखील मोफत उपचार सुरू करण्याचा निर्णय उद्या मुंबई गेल्यावर चर्चा करून घेणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.