माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज 25 जानेवारी रोजी पहाटे निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते. ते वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.
लहानपणापासून वाचन, वक्तृत्व याची आवड असणाऱ्या चपळगावकर यांनी शिक्षणाबरोबरच इतर अनेक क्षेत्रातील मित्र जोडले. सुरुवातीपासून कायदा आणि मराठी भाषा या दोन्ही विषयांवर त्यांचं एकाचवेळी एकसमान प्रेम राहिले. यामुळेच ते पत्रकारिता, अध्यापन, लेखन, वकिली, संपादन अशा विविध प्रकारचं काम करू शकले आहेत.चंपावती विद्यालय, लातूरचे दयानंद महाविद्यालय, औरंगाबादचे माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय येथे त्यांनी काहीकाळ अध्यापनाचे काम केले. बीडमधून केसरी, सकाळ, मराठवाडा, लोकसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. सकाळ आणि केसरीसाठी त्यांनी नियमित बातमीदारीचं कामही केलं. याशिवाय किर्लोस्कर मासिक, मनोहर साप्ताहिक तसेच प्रतिष्ठान, स्वराज्यसारख्या नियतकालिकांमध्ये त्यांनी लेखन केलं. मुकुंदराव किर्लोस्कर, शांताबाई किर्लोस्कर, प्रभाकर उर्ध्वरेषे यांच्याशी त्यांना दीर्घकाळ स्नेह राहिल्यामुळे अनेक साहित्यिक उपक्रमात त्यांना मोलाचा वाटा उचलता आला. नरेंद्र चपळगावकर यांचे वडील पुरुषोत्तम चपळगावकर हे काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सहभाग घेतला होता. न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे पार्थिव आज दुपारी ३ च्या सुमारास त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणण्यात येईल आणि सायंकाळी ४ वाजता अंत्ययात्रा निघून साडेचार वाजता अंतिम संस्कार प्रतापनगर येथे केले जातील.