पुणे : येत्या महापालिका निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा जिंकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची भेट देण्याचा निर्धार शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.
त्याचे प्रतिक म्हणून फडणवीसांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त मुळीक यांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण केक कापण्यात आला. या निमित्त फडणवीस यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणार्या निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे मुळीक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सरचिटणीस राजेश येनपुरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष बापू मानकर, लालजी मिश्रा, प्रतिक देसरडा, दीपक पवार, अक्षय वायाल, अभिजित राऊत, ओमकार केदारी, राजू परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण शहरात भाजपच्या वतीने 520 आरोग्य सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून 52 हजार नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात आल्या. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी 75 शिबिरे घेण्यात आली. बाल आरोग्य तपासणी, महिलांची तपासणी, ज्येष्ठ नागरिक तपासणी या शिबिरांबरोबर हृदय रोग, रक्तदाब, मधुमेह, दंतचिकित्सा, नेत्र तपासणी, हाडांची ठिसूळता अशा विविध शिबिरांचा समावेश होता.