पुणे- बदलत्या काळानुसार दिव्यांग बांधवांपुढील बदलणाऱ्या समस्या, अडचणींचा सामना करण्यासाठी त्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पुणे येथे होणारे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र दिव्यांगांचा आधार बनावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
औंध येथील जिल्हा रुग्णालय आवारात पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत दिव्यांग कल्याण निधीमधून उभारण्यात येणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “दिव्यांगांमध्ये एखाद्या कमतरतेच्या बदल्यात निसर्गाने एकतरी विशेष क्षमता दिलेली असते. त्यांनी तिचा दैनंदिन जीवनात योग्य उपयोग केला पाहिजे. त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी समाजाने मदत केली पाहिजे. दिव्यांगांचा कौशल्य विकास, शिक्षण, प्रशिक्षण यावर भर दिला जावा. त्यांना अत्याधुनिक, नविन तंत्रज्ञान शिकवले पाहिजे. दिव्यांगात्वर मात करण्यासाठी अत्याधुनिक उपचारपद्धती, कृत्रिम अवयव, सहाय्यभूत साधने या पुणे जिल्हा पुनर्वसन केंद्रातून देण्यात येणार असून याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र उभारण्याची गरज आहे” असेही ते म्हणाले.
पुणे येथे अन्य महत्वाच्या इमारतींप्रमाणे भव्य सामाजिक न्याय भवन उभारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेले ‘महाशरद’ पोर्टल दिव्यांग बांधव तसेच त्यांना मदत करू इच्छिणारे व्यक्ती, देणगीदार, समाजसेवी संस्था यांना एकाच छताखाली आणणारे आहे.
या पोर्टलवर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचीही माहिती देण्यात आली असून या पोर्टलवर नोंदणी करुन दिव्यांगांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दिव्यांग कल्याण निधीतून जिल्ह्यात दिव्यांगांना ई-रिक्षा देण्याचा उपक्रम राबविण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.