Pune

अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 25 मे ते 28 मेला पुण्यात होणार संपन्न

332 0

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुणे येथे दि 25 मे ते 28 मे या दिवसात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या बैठकीत विद्यार्थी परिषदेचे काम करणारे देशभरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. ही बैठक प्रत्येक वर्षी देशभरातील विविध शहरांमध्ये पार पडत असते. या वर्षी हा मान पुणे शहराला लाभला आहे. यापूर्वी पुणे शहरात ही बैठक 2006 साली झाली होती. तब्बल 18 वर्षांनंतर ही बैठक पुण्यात होत असल्याने पुणे महानगरातील सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने याची तयारी करत आहेत. या बैठकीत देशपातळीवर काम करणारे प्रमुख कार्यकर्ते पुढील वर्षभर करावयाच्या योजना ठरवतात. यामुळे, विद्यार्थी परिषदेत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आज दि 16 मे ला राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकी संदर्भात पहिली पत्रकार परिषद घेण्यात आली. यात या बैठकीच्या स्वागत समितीची घोषणा करण्यात आली. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी स्वागत समिती सचिव म्हणून बागेश्री मंठाळकर यांची घोषणा केली. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य आहेत. यानंतर, बागेश्री ताई मंठाळकर यांनी स्वागत समिती सहसचिव म्हणून राहूल पांगरीकर(सचिव,विद्यार्थी निधी ट्रस्ट) तसेच स्वागत समिती अध्यक्ष म्हणून बाबा कल्याणी(चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, भारत फोर्ज) व उपाध्यक्ष म्हणून संजय चोरडिया(अध्यक्ष, सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,पुणे) व प्रकाश धोका (प्रसिद्ध उद्योजक) यांची घोषणा केली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीसाठी संपूर्ण देशभरातून जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी तसेच त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवून देण्यासाठी दि. 26 मे ला शुभारंभ लॉन्स येथे नागरिक समारोह सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी,माजी सीडीएस मनोज नरवणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारत फोर्ज कंपनीचे संचालक बाबा कल्याणी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे दर्शन घडविण्यासाठी विविध कलाकृतींचा समावेश असणारा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होईल अशी माहिती स्वागत समिती सचिव बागेश्री ताई मंठाळकर यांनी दिली.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 25 मे ते 28 मे या दिवसात पुणे येथे आयोजीत केली आहे. या वर्षी अभाविपचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू असल्याने ही राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक देखील संगठनात्मक दृष्टीने महत्त्वाची आहे. देशभरातील प्रत्येक राज्यातून त्या ठिकाणी अभाविपचे प्रतिनिधित्व करत असलेले कार्यकर्ते, अखिल भारतीय पदाधिकारी, काही विशेष निमंत्रित सदस्य आणि नेपाळ मधील प्रतिनिधी देखील या बैठकीस अपेक्षित आहेत. या बैठकीत देशभरातील वर्तमान स्थिती, शैक्षणिक सद्यस्थिती यावर चर्चा केली जाते आणि त्यावर अभाविपची भूमिका ठरवली जाते. अभाविप चे विवीध आयाम, गतिविधी याचे देखील खूप महत्त्व असल्याने याला अनुसरून विवीध कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन केले जाते. या बैठकीत अभाविप शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य काही महत्वाच्या विषयाला अनुसरून प्रस्तावांचा विचार केला जातो आणि त्यावर प्रस्ताव पारित केला जातो. यामध्ये संगठनात्मक स्थितीवर चर्चा करुन आगामी काळात संगठनात्मक वाढीसाठी आवश्यक ते प्रयोग देखील केले जाते. वर्षभरात आयाम, गतिविधि, कार्यकर्त्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रम, शिबिरांचे, प्रशिक्षण वर्गाचे आयोजन देखील करते. विद्यार्थी परिषद चे वार्षिक काही ठराविक कार्यक्रम असतात यामध्ये नाविन्यता आणून अधिकाधिक कार्यकर्ते जोडले जातील याचा विचार या बैठकीत केला जाणार आहे अशी माहिती अभाविप राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide