kalyannagar

कल्याणीनगर येथे नदीच्या मधोमध अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलाकडून जीवदान

316 0

पुणे – आज दिनांक 13.05.2023 रोजी सकाळी 9 वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात एका तरुणाने कल्याणी नगर येथील पुलावरून नदीत उडी मारल्याची वर्दी प्राप्त होताच बी.टी.कवडे रोड व हडपसर अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, एक तरुण नदीच्या मधोमध जलपर्णी व एका झाडाचा आसरा घेऊन पाण्यात अडकला आहे. त्याचवेळी जवानांनी तत्परतेने नदीमध्ये रश्शी, लाईफ जॅकेट व लाईफ रिंगच्या साह्याने पाण्यात उतरून मधोमध अडकलेल्या तरुणाकडे जाऊन त्याला धीर देत त्याच्याशी संवाद साधून त्याला लाईफ जॅकेट व लाईफ रिंग देत सुमारे 30 मिनिटात सुखरुप पाण्याबाहेर काढले. सदर तरुणाचे नाव समजू शकले नसून वय अंदाजे 25 वर्ष आहे. तसेच तरुणाला काही प्रमाणात दुखापत झाल्याने शासकीय रुग्णवाहिका 108 मधून दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच नदीमधे पाण्यात पोहत जाऊन तरुणाला जीवदान देणारे तांडेल राजाराम केदारी, संदिप रणदिवे व फायरमन चंद्रकांत नवले, सुरज बडे आणि वाहनचालक अक्षय कलशेट्टी, अमित सरोदे व इतर फायरमन प्रताप फणसे, सूरज बडे, प्रशांत नवगिरे, शरद नवगिरे,नितेश डगळे, अजिंक्य खाडे यांनी सहभाग घेतला.

Share This News
error: Content is protected !!