पुणे: बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यात नुकतंच मोठं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात एकूण 17 संघटना सहभागी झाल्या होत्या. मात्र आता पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट पडले असून महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांना आंदोलन समितीतून वगळण्यात आलं आहे.
बाबा कांबळे यांना समितीतून वगळताना या पूर्वी अनेकवेळा समज देऊनसुद्धा सदर संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वर्तनात सुधारणा न केल्यामुळे त्यांना बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती मधून वगळण्याचा निर्णय समिती मधील उर्वरित सर्व १६ संघटनांनी एकमताने आज झालेल्या बैठकीत घेतला. त्यामुळे आता समितीत १७ ऐवजी १६ संघटना असतील. रिक्षाचालकांच्या प्रश्नांप्रती बेशिस्त व अप्रामाणिक अशी कोणतीही कृती आंदोलन समिती खपवून घेणार नसून ,चुकीचा संदेश पसरवून १२ लाख रिक्षा चालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या या आंदोलनाला कमजोर करणाऱ्या प्रति कोणतीही हायगय केली जाणार नाही याबाबत आंदोलन समितीतील सर्व सभासद ठाम आहेत व त्यांच्यामध्ये एकजूट आहे तसेच कोणत्याही प्रकारची फूट नाही. यापुढे आंदोलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सदर संघटनेचा समावेश नसेल असं आंदोलन समितीकडून सांगण्यात आलं आहे.