पुणे : पुण्यामधून (Pune News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये घराशेजारी असणाऱ्या अंगणात खेळत असताना एका पाच वर्षांच्या चिमुकल्याला सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चिमुकल्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. रघुनाथ मारुती भालेराव ( वय 5). असे सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके?
भोरच्या खानापूर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्यात पावसाने उसंत घेतल्याने सध्या वातावरणात उकाडा फार वाढला आहे. त्यामुळे अनेक प्राणी पक्षी गवत-वेलींचा आधार घेत आहेत. त्यामुळे मानवी परिसरातही त्यांचा वावर वाढला आहे. बुधवारी रघुनाथ हा आपल्या घराच्या शेजारी असणाऱ्या अंगणात बहिणीसोबत खेळत होता. यावेळी अचानक गवतात लपून बसलेल्या सापाने त्याला दंश केला. मात्र, रघुनाथ हा लहान असल्याने खेळण्या-खेळण्यात त्याला सर्पदंश झाल्याचे समजलेच नाही.
त्यादिवशी मध्यरात्री रघुनाथला अचानक त्रास होऊ लागल्याने त्याला भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रघुनाथ याला सर्पदंश झाल्याचे निष्पन्न झाले. त्याला कुटुंबीयांनी तात्काळ पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, दुर्दैवाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्या रघुनाथच्या मृत्यूमुळे खानापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.