पुणे : एनआयएकडून 5 लाखांचे बक्षीस असणाऱ्या दोन “मोस्ट वॉन्टेड” दहशतवाद्यांना पुण्याच्या कोथरूड भागातून पुणे पोलिसांच्या 2 जवानांनी पकडले आहे. मागच्या दीड वर्षांपासून हे दहशतवादी फरार होते. कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन या दोघांनी ही मोठी कामगिरी केली आहे.
काय घडले नेमके?
मंगळवारी पहाटे कोथरूड पोलिसांचे कर्मचारी गस्त घालत असताना कोथरुडच्या बधाई चौकात मोटर सायकल चोरी करताना 3 जण आढळून आले. यावेळी ड्युटीवर असलेल्या कोथरूड पोलीस (Police) ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन यांनी त्या 3 जणांना पकडले मात्र त्यामधील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर चव्हाण आणि नझन यांनी उर्वरित दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.
मोहमद युनूस साकी व इम्रान खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते उडवा उडवी चे उत्तरं देऊ लागले. यानंतर पोलिसांनी आपला इंगा दाखवल्यानंतर त्यांनी आपली खरी ओळख सांगितली. हे दोघे आरोपी राजस्थानात मोस्ट वॉन्टेड आहेत. यानंतर पुणे पोलिसांकडून आता एनआयए तसेच इतर तपास यंत्रणांना याबद्दलची माहिती देण्यात आली असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
पोलीस दलातील खरे धडाकेबाज पोलीस
या कामगिरीनंतर पुणे शहर पोलीस दलाकडून कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हे दोघे गरीब घरातील पोटासाठी नोकरी मिळविण्यासाठी पोलीस दलात अंमलदार म्हणून भरती झाले होते. केवळ स्पर्धा परीक्षा पास न झाल्याने पोलीस दलातील सर्वात शेवटच्या पायरीवर राहून ते आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र तरीदेखील त्यांची कामाची धडाडी पहिली तर यांच्यातील देशप्रेम आणि पोलीस दलाबद्दल असणारी आत्मीयता वाखाण्याजोगी आहे.