ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षीस

2245 0

पुणे: ‘पॅरिस ऑलिम्पिक’मध्ये कांस्य पदक पटकावून भारताची मान उंचावणारा मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसळे याला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते कुसळे यास पुण्यात हा बक्षिसाचा धनादेश देण्यात आला.

कोल्हापुरचा सुपुत्र असलेल्या कुसळे याने ‘पॅरिस ऑलिम्पिक’ गाजवत नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत युवा उद्योजक पुनीत बालन यांनी त्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सोमवारी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या आरतीचा मान कुसळे याला देण्यात आला. यावेळी त्यास ११ लाख रुपयांचा बक्षिसाचा धनादेश पुनीत बालन यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना कुसळे याने ‘पुनीत बालन ग्रुप’चे आभार मानले. ‘‘मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. बाप्पाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे, त्यामुळेच कांस्य पदक मिळाले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती करण्याचा मान मिळाला हे माझे भाग्य समजतो,’’ अशा शब्दांत यावेळी कुसळे याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यापूर्वीही ‘पुनीत बालन ग्रुप’ने अनेक गुणी आणि होतकरु खेळाडूंना आर्थिक छत्र देऊन त्यांच्या पुढील प्रवासात खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या कार्याचा समाजाच्या सर्वच स्तरातून गौरव करण्यात येत आहे.

‘‘नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक मिळवत स्वप्निलने केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं. त्याच्यासारखे अनेक प्रतिभावान खेळाडू घडण्याची गरज आहे. त्यादृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ अशा खेळांडूंच्या कायम पाठिशी राहिला आहे. भविष्यात स्वप्निल निश्चितच भारतासाठी सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास आहे. त्यासाठी त्याला ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आणि सर्व बाप्पाच्या सर्व भक्तांकडून शुभेच्छा.’’ असं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख विश्वस्त पुनीत पालन म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!