लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात भाजपा गुजरात पॅटर्न राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत असून यामुळे अनेक विद्यमान आमदारांना धडकी भरली आहे नेमका हा गुजरात पॅटर्न काय आहे पाहूया..
लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपाने 25 जागा लढवल्या यापैकी केवळ नऊ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी पीछेहाट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती तयार करत असून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वात भाजपानं निवडणूक 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली. यासोबतच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलं असून नुकतेच अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरही येऊन गेले. याच दरम्यान स्वतः अमित शहा यांनी महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू केला जाऊ शकतो असा सूचक संदेश आपल्या भाषणातून दिला आहे. आपण 35 वर्षांचे असताना आमदारकीसाठी पक्षांना आपलं तिकीट कापलं होतं त्यावेळी कुशाभाऊ ठाकरे यांना आपण तिकीट न मिळाल्याने दुःखी आहोत असं सांगितलं त्यावर कुशाभाऊ यांनी तू पक्षाचा प्रचार करू नकोस दुःखी मनाने कोणी प्रचार करू शकत नाही मात्र जर तू नाराज झालास तर तुला समजावण्यासाठी कोणीही तुझ्या घरी येणार नाही असं उदाहरण अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिलं आणि यामुळेच महाराष्ट्रातही गुजरात पॅटर्न लागू केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे
नेमका काय आहे गुजरात पॅटर्न पाहुयात?
- 2022 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 182 पैकी 156 जागांवर विजय मिळवला
- याआधी 2017 च्या निवडणुकीत केवळ 99 जागांवर भाजपाला यश मिळालं होतं.
- 2022 च्या निवडणुकीमध्ये या 99 पैकी 58 ठिकाणी भाजपाने आपले उमेदवार बदलले होते याचा फायदा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आलं.
- महाराष्ट्रात जर गुजरात पॅटर्न लागू झाला तर किमान 50 ते 60 विद्यमान आमदारांची तिकीट कापली जाऊ शकतात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भाजपा गुजरात पॅटर्न लागू करणार का आणि जर गुजरात पॅटर्न लागू झाला तर कोणत्या विद्यमान आमदारांची तिकीट कापली जाणार हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं असणार आहे…