यवतमाळ : शिवसेनेचे तब्बल 40 आमदार घेऊन बंड पुकारलेले एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अजून देखील इनकमिंग सुरूच आहे. आमदारांसह अनेक खासदार देखील शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत.
दरम्यान या शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी खासदार भावना गवळी यांचे देखील नाव समोर येते आहे, खा. भावना गवळी यांच्यासह आमदार संजय राठोड हे देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे समजते आहे.
मुंबईसह विभाग आणि जिल्हास्तरावरील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सध्या घेत आहेत. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड या दोघांना पक्षात पुन्हा स्थान नाही असे स्पष्ट केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा असे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन पर अनुदान दिले होते. त्याला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. यावर टीका करून संजय राठोड आणि भावना गवळी यांना पुन्हा पक्षात स्थान नाही असे या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे.