धाराशिव : धाराशिवमधून (Dharashiva) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर अंगावर येताच त्यांनी प्रसंगावधान राखून उडी घेतल्यामुळे ते या घटनेतून सुखरूप बचावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी टिप्पर चालकाला पकडले असून त्याची चौकशी सुरु आहे.
काय घडले नेमके?
धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) हे सकाळी व्यायाम करायला जात असताना अचानक टिप्परने धडक दिली. मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारल्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी भरधाव टिप्परचा पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे चालकाकडून सांगण्यात आले आहे. ही घटना चुकीने घडली की या मागे काही घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात टिप्पर चालकाविरोधात कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.