राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती व आरक्षण प्रश्न शरद पवार यांनी मध्यस्थी करत राज्यात सुरू असणारा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट होत असल्याची माहिती समोर आली.
आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचंही आयोजन केलं होतं, पण या बैठकीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला होता. आजच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.