आमदार योगेश टिळेकर (yogesh tilekar) यांचे मामा सतीश वाघ (satish wagh) यांचा खून झाला. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या हत्येचं गूढ वाढलं आहे. त्यामुळे त्यांचे मारेकरी कोण ? खूना मागे कारणं काय ? आणि पोलीस तपासातून आतापर्यंत काय काय हाती आलं ? वाचा सविस्तर.
अपहरण ते खून… संपूर्ण घटनाक्रम
फुरसुंगी फाटा परिसरात असलेल्या ब्लूबेरी हॉटेलच्या समोरून सकाळी साडेसहाच्या सुमारास सतीश वाघ यांचं अपहरण झालं. ही घटना त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने पाहिली. सातच्या सुमारास वाघ यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. साडेसात वाजता हडपसर पोलिसांना कळविण्यात आलं. साडेआठ वाजता गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. साडेनऊ वाजता पोलिसांची 12 पथक प्रत्यक्ष तपासासाठी रवाना झाली. बारा वाजल्यापासून सीसीटीव्ही आणि फोनच्या लोकेशन वरून तपास सुरू केला गेला.
तीन वाजता पुण्याचा आयुक्तांनी स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण तपासाचा आढावा घेतला. आणि तपास सुरू असतानाच साडेपाच ते सहाच्या दरम्यान शिंदवणे घाटात वाघ यांचा मृतदेह सापडला. शिंदवणे घाटाच्या परिसरात काही मुलं फिरत असताना त्यांना हा बेवारस मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आठ वाजता घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड पोहोचले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला. व पोलिसांच्या पथकांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला.
कोण होते सतीश वाघ ?
55 वर्षीय सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते. ते आपल्या कुटुंबासह हडपसरच्या मांजरी परिसरात वास्तव्यास होते. ते स्वभावाने अतिशय शांत आणि सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणारे होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेत जमीन असल्याने त्यांना शेतीची आवड होती. त्यांच्या मालकीचं एक हॉटेल देखील याच परिसरात आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार त्यांचं कोणाशीही थेट वैर नव्हतं. मात्र तरीदेखील सोमवारी त्यांचं अपहरण करून थेट खून करण्यात आला.