मुंबई- तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. पोनमुडी यांनी हिंदीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्या वादात आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. डॉ. पोनमुडी यांच्या वक्तव्यावर राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ‘एक देश, एक भाषा’ असे आवाहन केले आहे.
संजय राऊत म्हणाले, “मी हिंदी भाषेचा आदर करतो आणि संसदेतही बोलतो. संपूर्ण देशाला कळते. मी गृहमंत्री अमित शहा यांना ‘एक देश, एक विधान, एक भाषा’ करण्याची विनंती करतो. प्रत्येकाने भाषेचा आदर केला पाहिजे असे राऊत यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. के. पोनमुडी यांनी हिंदीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. कोईम्बतूर येथील भरथियार विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पोनमुडी यांनी हे वादग्रस्त विधान केले. पोनमुडी म्हणाले की, हिंदीपेक्षा इंग्रजी ही भाषा अधिक महत्त्वाची आहे. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्याचे आश्वासन दिले, परंतु राज्य सरकार आपले द्विभाषिक धोरण कायम ठेवेल. राज्यात इंग्रजीसारखी आंतरराष्ट्रीय भाषा शिकविली जात असताना हिंदी का शिकायची, असा प्रश्न त्यांनी केला. तामिळ भाषिक विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास इच्छुक आहेत परंतु हिंदी हे ऐच्छिक असले पाहिजे आणि त्यांच्यासाठी अनिवार्य नाही असे पोनमुडी म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी सांगण्यावरून बिगरहिंदी भाषिक राज्यांमध्ये वाद सुरू असताना त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. या पूर्वीही पोनमुडी म्हणाले होते की, केवळ एकच भाषा बोलणे भारतात स्वीकारले जाऊ शकत नाही. इतरांशी बोलण्यासाठी इंग्रजी आणि त्यांच्या राज्यातील लोकांशी बोलण्यासाठी स्थानिक भाषा अवगत असावी असे ते म्हणाले होते.