Sajan Pachpute

Sajan Pachpute : इनकमिंग सुरु ! साजन पाचपुते आज करणार ठाकरे गटात प्रवेश

686 0

मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते (Sajan Pachpute) हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सायंकाळी पाच वाजता मातोश्री या निवासस्थानी भेट घेऊन हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यामुळे आता भविष्यात राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळणार आहे. साजन पाचपुते यांच्या प्रवेशानंतर त्यांना ठाकरे गटात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

‘त्या’ निवडणुकीवरून पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली
साजन पाचपुते हे भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत पार पडली होती. या निवडणुकीत साजन यांनी बहुमताने विजय मिळवला आणि त्यावेळी पाचपुते कुटुंबामध्ये वादाची ठिणगी पडली. यानंतर साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवली आणि जिंकलीदेखील. यामुळे हा वाद अजूनच वाढला.

सध्या साजन पाचपुते यांच्याकडे काष्टी तालुक्यातील सरपंच आणि बाजार समितीचे संचालक ही पदे आहेत. असे असतानादेखील राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते. मात्र, साजन पाचपुते आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील महिन्यात मुंबईत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुते यांनी भेट घेतली होती. तेव्हाच साजन हे ठाकरे गटाच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाला होता.

Share This News
error: Content is protected !!