आपला महाराष्ट्रराजकारण

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक संपली; काय झाला निर्णय?

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आठवा दिवस असून त्यांचीही प्रकृती खालावत चालली आहे. यामुळे मराठा समाजही आक्रमक झाला आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था यावर चर्चा झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे.

राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.