शरद पवार गटातून अजित पवारांकडे इन्कमिंग; दोन मोठे नेते करणार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश ?

EDITORIAL: संपादकीय! काका-पुतण्या एक झाले तर कुणाचे काय गेले?

2715 0

Anything can happen in Politics… राजकारणात काहीही घडू शकतं; त्यात महाराष्ट्राच्या राजकारणात तर काहीही! ‘परवापर्यंत एक होते, काल भांडले, आज एकत्र आले…’ कोणत्याही कुटुंबातल्या कोणत्याही दोन नात्यांमध्ये घडणारी ही अतिसामान्य गोष्ट! महाराष्ट्राच्या राजकारणाची ‘Power’ म्हणून ज्या कुटुंबाचा उल्लेख होतो त्या पवार कुटुंबात ही गोष्ट घडली तर त्यात बिघडलं कुठं?

‘बिनसणं’ आणि ‘बिघडणं’ या दोन्ही शब्दांत कुणी गफलत करू नये. त्या दोघांचं बिनसलं याचा अर्थ त्यांचे नातेसंबंध बिघडले असा होत नाही. एखाद्या मुद्यावर एकमत न झाल्यास एकमेकांविषयी एखाद्या कृतीतून प्रगट होणारी नाराजी म्हणजे ‘बिनसणं’ असतं आणि एकमेकांनी एकमेकांना शत्रूस्वरूप वागणूक देणं म्हणजे नातेसंबंध ‘बिघडणं’ असतं.

पवार काका-पुतण्याच्या नात्यात बिनसलं होतं, त्यांचं नातं बिघडलं नव्हतं. अजितदादांचा जन्म 1959 चा, तर साहेबांचा जन्म 1940 चा! अर्थात, अजितदादांच्या जन्मावेळी साहेब 19 वर्षांचे होते. म्हणजे साहेबांनी दादांना त्यांच्या बालपणापासून म्हणजेच त्यांच्या जन्मापासून अंगाखांद्यावर खेळवलंय. म्हणजे हे काका-पुतण्याचं नातं किती घट्ट असेल याचा तुम्हीच विचार करा.
साहेब, 27 व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा दादांचं वय होतं अवघे 08 वर्षे! आणि साहेब जेव्हा वयाच्या 38 व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा दादांचे वय होते 19 वर्षे! म्हणजे दादा 08 वर्षांचे असताना साहेब आमदार होते आणि दादा 19 वर्षांचे झाले तेव्हा साहेब मुख्यमंत्री होते. म्हणजे दादा इयत्ता चौथी-पाचवीत असल्यापासून राजकारणातल्या साहेबांना पाहात आलेत. त्यामुळं या काका-पुतण्याचं नातं जितकं जिव्हाळ्याचं आहे तितकंच ते राजकारणातील ‘साहेब-दादा’ या गुरू-शिष्याचंही आहे. त्यामुळं हे नातं तुटता तुटणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ताणलं तर तुटतं, असं म्हणायला हे काय तकलादू नातं नक्कीच नाही किंवा ताणल्यावर तुटेल म्हणायला तो काही रबर नाही. प्रेम आणि जिव्हाळ्याच्या घट्ट रेशमानं विणलेल्या या नात्याची वीण उसवणं हे सहजासहजी शक्य नाही.

मग या पवार काका-पुतण्यानं आपलं कौटुंबिक नातं जपता जपता आपली राजकीय सोय पाहिलं तर बिघडलं कुठं? कारण हेच साहेब जेव्हा 51 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी दादांना पहिल्यांदा खासदार, आमदार होताना पाहिलंय आणि 70 वर्षांचे झाल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री होतानाही पाहिलंय. म्हणजेच या दोघांनीही एकमेकांना राजकीय शिखरावर चढताना पाहिलंय.

आता साहेबांनी वयाची 84 ओलांडलीये तर दादांनी वयाची साठी! आता या दोघांकडं संपूर्ण महाराष्ट्र राजकारणातले ज्येष्ठ नेते म्हणून पाहातंय. मग, या ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार केला असेल तर तो चुकीचा कसा मानायचा? काका-पुतण्या एक झाले तर कुणाचे काय गेले? बाकीचे उगाचच आपलं डोकं लावत बसले! Anything can happen in Politics… राजकारणात काहीही घडू शकतं; त्यात महाराष्ट्राच्या राजकारणात तर काहीही!

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक ‘TOP NEWS मराठी’

विशेष संपादकीय:राजकीय रंगमंचावरील सत्तानाट्य!…आणि मोठ्या भावाच्या भूमिकेत…

Share This News
error: Content is protected !!