देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरोधात संघर्ष करणारी प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांची काँग्रेस पक्षामध्ये एन्ट्री झाली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत या दोन्ही कुस्तीपटूंचा पक्षप्रवेश पार पडला.
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी चर्चा देखील केली आणि त्यानंतर आज या दोघांनी दोघांनी काँग्रेसमध्ये जाहीरपणे प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, नेते पवन खेरा, हरियाणा काँग्रेसचे प्रमुख उदय भान आणि हरियाणाचे एआयसीसी प्रभारी दीपक बाबरिया उपस्थित होते.
पक्षप्रवेश केल्यानंतर विनेश फोगाट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, ‘ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कोर्टातला लढा अजून संपलेला नाही. सुरूच आहे. आम्ही तो लढा नक्की जिंकू. मात्र काँग्रेसच्या माध्यमातून नवीन व्यासपीठ मिळत आहे, त्यासोबत आम्ही काम करू. देशसेवेसाठी, आपल्या जनतेसाठी आम्ही सर्वोत्तम काम करू, लोकांसाठी जिथे कोणी नसेल, तर मी तिथे असेल, काँग्रेस पक्ष असेल.’ या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.