केंद्राची ‘पीएम कुसूम योजना’ कागदावरच! ; राज्यात 1 लाख सौर पंप मंजूर,पण बसवले केवळ 7,713

159 0

मुंबई : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी व भारनियमनापासून मुक्ती मिळावी म्हणून केंद्र सरकारने पीएम कुसूम योजना सुरू केली. या योजनेतून महाराष्ट्रात १ लाख सौर पंप मंजूर झाले. परंतु, प्रत्यक्षात केवळ ७ हजार ७१३ पंपच बसवण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.

रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी याबाबतचा प्रश्न संसदेत विचारला होता. त्यांना मिळालेल्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रात स्थापित सर्व पंप ऑफ ग्रीड आहेत. ते ग्रीडशी जोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या सौर पंपाद्वारे निर्मित अतिरिक्त ऊर्जेचा विक्रय करता येत नसल्याने त्यातून कोणताही आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही.

सोलर पंप स्टॅन्ड अलोन आहे. यापूर्वी शेतकरी सिंचनासाठी डिझेल पंपचा वापर करत होते. त्यामुळे आता सौरपंप बसवल्याने डिझेलच्या खर्चाची बचत होत आहे. सौर पंप स्थापनेसाठी केंद्र सरकारकडून ३० टक्के अनुदान दिले जाते. दरम्यान, सरकारच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या योजनेच्या प्रचार व प्रसाराची गरज आहे. प्रचार व प्रसार नसल्याने शेतकऱ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत असल्याचे कृपाल तुमाने यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात केवळ ९२ पंप

नागपूर जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राज्याचे ऊर्जामंत्रीपद मिळत आहे. पूर्वी चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यानंतर डॉ. नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जामंत्रीपदाची जबाबदारी होती. परंतु, तरीही नागपूर जिल्ह्यात केवळ ९२ सौर पंप लावण्यात आले आहेत. त्यातील ११ रामटेक तालुक्यातीलच आहेत.

Share This News
error: Content is protected !!