मुंबई: राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सज्ज झाला असून लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यानंतर भाजपाचा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळतोय.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 25 जागा लढवल्या यापैकी केवळ सात जागांवर भाजपाला यश आलं. लोकसभेतील हा पराभव लक्षात घेऊन भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला असून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि जालना लोकसभेचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे निवडणूक संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर भाजपाने 34 जणांची निवडणूक व्यवस्थापन समिती ही जाहीर केली आहे.
याबरोबरच आता भाजपाने नो रिस्क धोरण अवलंब असल्याचे माहिती मिळत असून काही केंद्रीय पातळीवरील नेत्यांकडेही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपाकडून दिग्गज नेते मैदानात असणार आहेत याबरोबरच इतर राज्यातील 60 नेत्यांवर महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
इतर राज्यातील नेते हे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. हे नेते आपला अहवाल केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडे सादर करणार असून या अहवालाच्या आधारे निवडणुकीचा निर्णय घेतला जाणार आहे.
या केंद्रीय पातळीवरील नेत्यांवर सोपवली जबाबदारी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, भाजपा नेते आणि मध्यप्रदेश मधील शहरी ग्रामीण विकास मंत्री कैलास विजयवर्गीय, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल आणि मध्यप्रदेश सरकारमधील विद्यमान मंत्री प्रल्हाद पटेल आधी नेत्यांवर महाराष्ट्र भाजपाला महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे