केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती दौऱ्यावर येत असून यावरून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षानं विशेष लक्ष केंद्रित केल्याचे पहावयास मिळत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील प्रमुख लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मिशन 45 ची घोषणा करण्यात आली असून यानुसारच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन एक महिना उलटला. त्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
पक्षाच्या मिशन 45 चा एक भाग म्हणून, भाजपने सीतारमण यांना बारामतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची प्रमुख भूमिका सोपवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा घेणार आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतील आणि त्यानंतर बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर विधानसभा मतदारसंघात विस्तृत दौरा करतील. या काळात त्या पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवादात्मक बैठका घेतील आणि पक्ष संघटनेच्या बूथनिहाय स्थितीचा आढावा घेतील अशी माहिती मिळत आहे.
बारामती लोकसभा काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोदी लाटेत 2014 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना मैदानात उतरवलं होतं सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज देण्यात जानकर यशस्वी ठरले असले तरी या निवडणुकीत जानकारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला 2019 मध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपाने रिंगणात उतरवलं मात्र त्यांनाही पराभवाला सामोरे जावं लागलं त्यानंतर आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या विशेष नियोजनात पवारांचा बालेकिल्ला भाजपा सर करणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल