गोवा : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून सुरू होते आहे. तत्पूर्वीच गोव्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून 11 पैकी १० आमदार भाजपमध्ये सामील होण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते आहे.
या राजकीय हालचालींचा अंदाज येताच काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव तातडीने दाखल झाले असून आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. परंतु विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह ९ काँग्रेसचे आमदार भाजपात विलीन होण्याच्या निर्णयाबाबत ठाम असल्याची माहिती मिळते आहे.
त्यासह भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून देखील मान्यता मिळाली आहे अशी माहिती भाजपच्या स्थानिक वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपर्यंत काँग्रेसचे हे १० आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
