नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या सर्व कार्यकर्त्यांचा अमित ठाकरेंकडून सत्कार करण्यात येणार आहे.जामीन मिळाल्यानंतर तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या सत्काराला अमित ठाकरे उद्या नाशिकला येणार आहेत. टोल नाका तोडफोड करणाऱ्या नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांचा उद्या सकाळी 11 वाजता अमित ठाकरे स्वतः सत्कार करणार आहेत.
काय घडले होते नेमके?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेविरोधात संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती.