‘कारण नसताना सुनील टिंगरे यांचं नाव गोवण्याचा प्रयत्न’; पोर्शे कार अपघातात प्रकरणी अजित पवारांची टिंगरेंना क्लीनचीट
पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मात्र याच वेळी कल्याणी नगर अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांच्यावर झालेले आरोप त्यांनी खोडून काढले.
अजित दादांची टिंगरेंना क्लीन चीट
आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंचावर राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे हेदेखील मंचावर होते. त्यामुळे अजित पवार यांनी कल्याणी नगर अपघातावर भाष्य केले. कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे वारंवार बोलले गेले. बिल्डर विशाल अग्रवाल याच्याशी टिंगरेंचे जवळचे संबंध असल्यामुळे आणि सुनील टिंगरे स्वतः येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र अपघातग्रस्तांना बघायला गेले नाही, यावरून वारंवार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार म्हणाले की, ‘कल्याणी नगर अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांची चौकशी झाली आहे. चौकशीतून काहीही समोर आलं नाही. विनाकारण लोकप्रतिनिधींची बदनामी काही लोक करत आहेत. मतदार संघातील नागरिकाचा फोन आल्यानंतर आमदार म्हणून मदतीला जावं लागतं. पण विनाकारण टिंगरे यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे’, अशी टीका विरोधकांवर करत सुनील टिंगरे यांना मात्र क्लीन चीट दिली.