इचलकरंजी नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत होणार असून तशी घोषणा करण्यात आली आहे. इचलकरंजी आता राज्यातील 28 वी महापालिका घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिकांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.
याबाबतची घोषणा गुरुवारी नगरविकास विभागाकडून करण्यात आली. अधिसूचना जारी करून ही याची घोषणा केली गेली यामुळे आता इचलकरंजी महापालिका होण्याचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला आहे. आता या पालिकेचं महापालिकेत रुपांतर होईल.
कोणतीही हद्दवाढ न होता महापालिका होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारकडून तसा जीआर काढण्यात आला आहे. या महापालिकेसाठी जास्तीचा निधी दिला जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इचलकरंजी ही महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका असेल. इचलकरंजीचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. मंत्रालयात वरिष्ठ नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. मविआ सरकारच्या तसेच ही मागणी करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांचे धैर्यशील माने यांनी आभार मानत अभिनंदन केलं आहे.