मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 81वर्षांच्या होत्या. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या (Seema Deo) पत्नी होत्या. सीमा देव यांनी विविध चित्रपटांच्या माध्यमातून लोकांच्या मनात आपली ओळख निर्माण केली होती. आनंद या सिनेमात त्यांनी राजेश खन्नासह केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे.
सीमा देव या मागच्या काही वर्षांपासून आजारी होत्या. 2020 मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. रमेश देव आणि सीमा देव या दोघांकडेही सिनेसृष्टी अत्यंत आदरपूर्वक पाहात होती. आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे.
रमेश देव आणि सीम देव यांनी मराठी चित्रपटांपेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. केवळ अभिनयानेच नाही तर आपल्या प्रेमकहाणीनेही त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं. त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात रमेश देव यांनीदेखील भूमिका साकारली होती. या पहिल्याच चित्रपटापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडली. सीमा देव यांनी ‘सरस्वतीचंद्र’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आनंद’, ‘कोशिश’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. 1962 मध्ये ‘वरदक्षिणा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सीमा आणि रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुलं आहेत. त्यापैकी अजिंक्यनेही आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तर अभिनय हा दिग्दर्शन आणि पटकथा लेखन क्षेत्रात कार्यरत आहे.